मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली असून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे यांनी गुरुवारी केली. या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले असून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळाल्याखेरीज भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही , असा निर्धारही आ. कुटे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यावेळी उपस्थित होते.
आ. कुटे म्हणाले की , अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला. मसाले पॅकिंग मशीन , बटन तयार करणारी मशीन , आटा मशीन याची विक्री मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने करण्यासाठी सुमारे २६ जिल्ह्यांत या कंपनीच्या शाखा उघडल्या. जिल्ह्याजिल्ह्यात महिला डेव्हलपमेंट ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला. प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५ हजार रु. दरम्यान ठेवण्यात आली. या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदीही केल्या. त्यानंतर मात्र कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता तर कंपनीचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले असून कंपनीचा मालक हिवरे हा फरार झाला आहे. व्यवसाय वाढीसाठी अकोला , बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचे उघड झाले आहे.
हजारो महिलांनी ११ हजार रु . भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी आपल्या गावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी , लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही आ. कुटे यांनी केले.