इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आणखी एक धक्का महायुती सरकारने दिला आहे. त्यांनी घेतलेल्या पुस्तकाला वह्यांचीपाने जोडण्याचा निर्णयही रद्द होण्याची शक्यता आहे. याअगोदर गणवेश योजनेत बदल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी घेतलेला दुसरा निर्णय थेट रद्द केला जाणार असल्याची चर्चा आहे.
मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयात आता बदल केले जात आहे. गणवेशाच्या निर्णयावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण, आता वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचेच मंत्री दादा भुसे हेच घेणार असल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसणार आहे. नव्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर चर्चा करुन हा निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या निर्णयावर फेरविचार सुरु झाला आहे.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरुन दप्तराचे ओझे कमी होईल. याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असतांना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्ये याच्या नोंदी घेतल्या जातील असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता.