इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत प्रचाराचे रणशिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुंकले.
महायुतीच्या महाविजयाचा संकल्प करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा उमेदवारांच्या प्रचारासाठी नारळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश अबीटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोक माने, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या या प्रचारसभेत महायुतीच्या खालील प्रमाणे १० वचनांची घोषणा करण्यात आली.
१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती.
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये.
३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार.
७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार.
८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन.
९) वीज बिलात ३० टक्के कपात.
१०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.