इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर आज महायुतीची बैठक मुंबई होती. पण, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला होता. त्यांच्या चेह-यावर अजिबात उत्साह नव्हता. पत्रकारांशी बोलतांनाही त्यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले. दरम्यान दिल्लीत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रात श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिमंपद मिळणार असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे सकाळीत तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दुपारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्र बैठक झाली.
या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. त्यानंतर आज मुंबईत बैठक होती. पण, आता ती पुढे ढकलण्यात आली आहे.