नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महायुतीच्या मंत्रिमंडळाचा खातेवाटपाची माहिती समोर आली आहे. भाजपकडे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उर्जा ही महत्त्वाची खाते असणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडे नगरविकास व गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अर्थ, महिला आणि बालविकास व उत्पादन शुल्क ही खाती जाणार आहे.
खातेवाटपाची शिवसेनेची व राष्ट्रवादीची यादी मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही तासात खाते वाटप जाहीर केले जाणार आहे. गृह खाते हे देवेंद्र फडणवीस, अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे तर गृहनिर्माण हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. तर बालविकास कल्याण मंत्रिपदी अदिती तटकरे यांची पुन्हा वर्णी लागणार आहे.
खातेवाटपाबाबत महायुतीत सहमती झाली असून गेल्या मंत्रिमंडळात असलेली बहुतांश खाते जशी आहे तशीच त्या पक्षाकडे ठेवण्यात येणार आहे. फक्त महत्त्वाच्या खात्यात काही बदल केले आहे. शिवसेनेकडे असलेले उत्पादन शुल्क खाते हे राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. तर भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते हे शिवसेनेला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास खाते हे ऱाष्ट्रवादीकडेच राहणार आहे.