इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह २६ राज्याचे मुख्यमंत्री उपस्थितीत राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. पण, उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्विकारणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशीरापर्यंत त्याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर मात्र संथगतीने हालचाली सुरु होत्या. पण, बुधवारी भाजपने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडवणीस यांची निवड केली. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह किती मंत्री शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट नाही.
नव्या सरकार स्थापनेचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.