मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत 100 युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर 5 रु. 87 प्रति युनिट पर्यंत तर 101 ते 300 युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर 11.82 रु. प्रति युनिट पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, एक एप्रिल पासून महावितरण च्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील. अशी माहिती महावितरण चे स्वतंत्र संचालक व भाजपा प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिली.
100 युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर 5 रु. 87 पर्यंत तर 101 ते 300 युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा दर 11.82 रु. पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव महावितरण ने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचेही श्री. पाठक यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाठक बोलत होते. प्रदेश भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी , घरगुती व औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे श्री. पाठक यांनी स्पष्ट केले .
श्री. पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षांत 16 हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरण ला होणार आहे. महावितरण चा सरासरी वीज पुरवठ्याचा दर कमी होणार असल्यामुळे 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज दर 7 रु. 65 पैशा पासून (प्रती युनिट) 5 रु. 87 पैसे पर्यंत म्हणजेच 23 टक्क्यांनी कमी होतील तर 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे दर सरासरी 13.49 रु. प्रति युनिट रु.11.82 पर्यंत म्हणजेच 12 टक्क्यांनी कमी होतील, अशी आशाही श्री. पाठक यांनी व्यक्त केली . औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलत, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील तसेच औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याची माहितीही श्री. पाठक यांनी दिली.
श्री. पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे अनेक फायदे पुढील पाच वर्षांत ग्राहक आणि महावितरण ला होणार आहेत. महावितरण चा सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्याच्या 9 रु. 45 पैसे या दरावरून 2029 – 30 पर्यंत 9 रु. 14 पर्यंत खाली येणार आहे.