नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या सिडको तथा परिसरात पतंग उडवताना होणाऱ्या दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच विद्युत सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महावितरणच्या सिडको उपविभागाकडून ग्रामोदय विद्यालय येथे वीज अपघात व सुरक्षितता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नाशिक शहरात व जिल्हयात मकर संक्रातीला मोठ्या प्रमाणावर पंतग उडविण्यात येतात. पतंग उडविताना होणारे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी महावितरण तर्फे नेहमीच सुरक्षा विषयक उपयोजना संदर्भात विविध माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येत असते. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून त्यांना सुरक्षेविषयी जागृती करून दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी
नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असणाऱ्या सिडको उपविभागाने सुरक्षाविषयक जागृतीसाठी ग्रामोदय विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांनी माहिती देवून मार्गदर्शन केले. सदर जागरूकता अभियान सिडको भागांतील इतर विद्यालयात सुध्दा राबविण्यात येणार आहे.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दिपक सखाराम ह्याळीज, सर्व कर्मचारीवृंद, महावितरणचे सहाय्यक अभियंते अलेशकुमार लंके, राहुल शिंदे, कनिष्ठ अभियंता शीतल खातळे,जनमित्र व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.