नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड भागातील वेगवेगळया ठिकाणी वीज चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वीज वितरण कंपनीच्या रायगड येथील भरारी पथकाने छापे टाकत चोरीचा हा प्रकार उघड केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
कळंबोली जि.रायगड येथील अतिरीक्त कार्यकारी अभियंता बकुळ मानवटकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महावितरणच्या कळंबोली भरारी पथकास दिंडोरीरोड भागात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२१) पथकाने नाशिक गाठून ही कारवाई केली असून यात दिंडोरीरोडवरील अंबादास पांडूरंग पवार यांनी गेल्या १२ जून ते मे २०२४ दरम्यान वीज चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या काळात पवार यांच्याकडून ४४ हजार ९०० रूपयांची वीज चोरी करण्यात आल्याचा फिर्याद म्हटले आहे.
दुसरी कारवाई याच भागातील पोकार कॉलनीत करण्यात आली. मुकेश जगदिश राजपूत यांच्या सदनिकेस जोडलेल्या वीज कनेक्शनमध्ये फेरफार करण्यात आल्याचा प्रकास समोर आला आहे. या ठिकाणी २१ जूले २०१९ ते मे २०२४ दरम्यान तब्बल बारा हजार ८३ युनिटची वीज चोरी करण्यात आल्याचे वास्तव समोर आले असून त्यांनी २ लाख १५ हजार ४४८ रूपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही गुन्हे भद्रकाली पोलीसांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याकडे वर्द केले आहेत.