नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर एकूण अर्ज केलेल्या ग्राहकांमध्ये नाशिक परिमंडळातील २२ हजार ८३९ ग्राहकांनी अर्ज केलेला असून त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांनी १८.५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली असून उर्वरित ग्राहकांचे घरे सुद्धा सौर ऊर्जेने प्रकाशमान होणार आहेत. या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
महिनाभरात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महावितरण नाशिक परिमंडळ अंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांमध्ये नाशिक मंडळात एकूण १० हजार ५६० ग्राहकांनी अर्ज केला असून ३५०३ ग्राहकांची सौर यंत्रणा स्थापित झाली आहे तर मालेगाव मंडळात २ हजार ५७८ अर्ज आले असून २०५ ग्राहकांची सौर यंत्रणा बसविली आहे आणि अहमदनगर मंडळात ९ हजार ७०१ अर्ज प्राप्त झाले असून १४४० ग्राहकांकडे सौर यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. अशाप्रकारे नाशिक परिमंडळातील एकूण २२ हजार ८३९ ग्राहकांनी अर्ज केलेला असून त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांकडे १८.५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा उभारण्यात आली आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापितकरण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे. ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी रु.९०,००,००० पर्यंत रु. १८,००० प्रती कि.वॅ प्रमाणे अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट पर्यंत लागू आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत असून त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध आहे.
वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अँप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी विस्तृत माहिती व मार्गदर्शन मिळावे याकरिता महावितरण नाशिक परिमंडळाच्या वतीने ग्राहक संवाद मेळावे सुद्धा आयोजित केलेले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा आणि ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.