ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांच्याकडून महावितरण, महानिर्मितीचे कौतुक
मुंबई – कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये १५ राज्यांत भारनियमन होत असताना महाराष्ट्रात आठवडापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून राज्यात कुठेही भारनियमन करण्याची वेळ आली नाही. ही परिस्थिती गुरुवारीही (२८ एप्रिल) कायम होती. या कामगिरीसाठी ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले आहे.
कोळसा टंचाईसह विविध कारणांमुळे वीजसंकट गडद झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना भारनियमन करावे लागले आहे. मात्र महाराष्ट्रातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून विविध स्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही क्षणाला विजेची तूट निर्माण होत असल्याची स्थिती दिसून येताच पर्यायी वीज उपलब्ध करून भारनियमन टाळण्यात महावितरणला यश येत आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. २२) गुरुवारपर्यंत (दि. २८) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. गुरुवारी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने २४ हजार ७ मेगावॅट या आजपर्यंतच्या सर्वोच्च मागणीइतका वीजपुरवठा केला.
ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी या कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे कौतुक केले आहे. तसेच महानिर्मितीनेही राज्यातील सर्व २७ संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती वाढवली आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना साथ दिली. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.संजय खंदारे यांचेही कौतुक केले आहे.
महावितरणची गुरुवारी दुपारी ४ वाजता २४ हजार ७ मेगावॅट विजेची मागणी होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस प्रकल्पांतून ७६७९ मेगावॅट, केंद्राकडून ५४३४ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून १४३० मेगावॅट, अदानीकडून २९८३ मेगावॅट, रतन इंडियाकडून १२०० मेगावॅट, बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १४०२ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १०९२ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून ४६० मेगावॅट, एम्को १९४ मेगावॅट, सीजीपीएल ७३५ मेगावॅट, साई वर्धा १५१ मेगावॅट, सहवीज निर्मितीतून ९०५, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून ३४२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करता आला. येत्या काळात सुद्धा ही परिस्थिती कायम राहील यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे.