नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरणच्या नाशिक मंडळातील चांदवड ग्रामीण शाखा कार्यालय १ अंतर्गत येत असलेल्या निमगव्हाण येथील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील सर्व ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित न करता सुद्धा वीज वापरापोटी आलेल्या देयकाची रक्कम मार्च २०२२ मध्ये पूर्णता शंभर टक्के भरून सहकार्य करीत महावितरणची शून्य थकबाकी असल्याचा बहुमान मिळविला आहे. सदर गावातील शून्य थकबाकीसाठी पुढाकार घेऊन तत्पर व अखंडित सेवा देणारे वरिष्ठ तंत्रज्ञ गोवर्धन बळीराम शिंदे यांचा नुकताच महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सन्मान केला आहे.
दरमहा वीज पुरवठा केलेल्या व त्यापोटी आकारलेल्या वीजदेयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना सातत्याने पाठपुरावा करून, नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे महिनोंमहिने दुर्लक्ष करीत असलेल्या थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केले जाते. यामध्ये महावितरण कर्मचारी आणि ग्राहक यांना त्रास होत असतो. मात्र चांदवड उपविभागातील निमगव्हाण अपवाद ठरले असून या गावात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १६० ग्राहक असून या सर्व ग्राहकांनी मार्च मध्ये आपली वीज देयकाची रक्कम भरून थकबाकी शून्य केली आहे. यासोबतच कृषीपंपाचे ३२८ ग्राहक असून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत १७० ग्राहकांनी ५३ लाख रुपयांचा भरणा करीत महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळवीत वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत.
चांदवड ग्रामीण शाखा १ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ गोवर्धन बळीराम शिंदे आणि ग्राम विद्युत व्यवस्थापक देविदास गायकवाड हे या गावातील ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज सेवा देत असतात. येथील विद्युत यंत्रणा सुस्थितीत असून देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम नित्यनेमाने सुरु असते. त्याचबरोबर सर्व ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी झालेले असून या गावातील ग्राहकांचा सामाजिक माध्यमावर समूह असून त्यांना यामाध्यमातून विविध योजना ,सेवा व इतर माहिती देण्यात येत असते. ग्रुपवर वीज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांचा फोटो टाकून इतर ग्राहकांना सुद्धा प्रोत्साहित करण्यात येत असते. कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची माहिती देण्यासाठी विविध बैठका व मेळावे सुद्धा घेण्यात आले आहेत. या सर्व कार्याबद्दल नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी नुकताच तंत्रज्ञ गोवर्धन बळीराम शिंदे यांचा सन्मान केला आहे. यावेळी चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड व चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील सुद्धा उपस्थित होते. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सुद्धा निमगव्हाण येथील ग्रामस्थांचे आभार व्यक्त करीत सेवा व कार्याबद्दल येथील अभियंता व जनमित्र यांचे कौतुक केले आहे.