नाशिक– महावितरणमध्ये आपली सेवा देत असताना दुर्दैवी निधन झालेल्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी महावितरण प्रशासन खंबीरपणे असून, घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंब कोलमडत असते, अशा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी रूपाने आधार देण्यासाठी या कुटुंबाच्या अडचणी, समस्या व प्रलंबित बाबी स्वयंस्फुर्तीने सोडविण्यात येतील तसेच त्यांना नोकरीसाठी आवश्यक ते सहकार्य व तत्पर मदत नेहमीच देणार असल्याचे आश्वासन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिले. महावितरणमध्ये सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याच्या कामाला गती देण्यासाठी आज २४ मार्च गुरुवारी विद्युत भवन येथील सभागृहात नाशिक मंडळ अंतर्गत मानव संसाधन विभागाच्या वतीने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांचा मेळावा व संवाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना नोकरीसाठी येणा-या अडचणी स्वतः पुढाकार घेऊन सोडविण्याचे व पुढाकार घेऊन आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार नाशिक मंडळ मानव संसाधन विभागाच्या वतीने अवलंबितांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक परिमंडल अंतर्गत असलेल्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या २८ वारसांना मार्च महिन्यात मासिक निर्वाह भत्ता प्रकरणे परिमंडळ स्तरावर निकाली काढली असून त्यामुळे यासंदर्भात परिमंडळात झिरो पेंन्डसी आहे, ही कामे पाठपुरावा करून गतिमानतेने केल्याबद्दल उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांचे मुख्य अभियंता यांनी यावेळी अभिनंदन केले. नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सुद्धा संवाद साधीत महवितरण प्रशासन सदैव आपल्या पाठीशी असल्याचे आश्वस्त केले. अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित सर्वच अवलंबितांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील १५ वारसांच्या कुटुंबीयांनी मेळाव्यात सहभाग घेतला. त्यापैकी २ वारसांचे प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले. तर उर्वरित वारसांचे विषयांना सुद्धा मार्गदर्शनाने गती मिळाली असून लवकरच मार्गी लागणार आहेत. मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले आणि सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने यांनी उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे या मेळाव्यातच निवारण केले. यावेळी मानव संसाधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिक संवाद साधीत त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेत अपूर्ण व नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी त्यांना सविस्तर माहिती देऊन संवाद साधला. तसेच अपूर्ण कागदपत्रे, कायदेशिर वारस असल्याचे प्रमाणपत्र तातडीने जमा करण्याच्या सूचना यावेळी वारसांना देण्यात आल्या. यावेळी वारसांनी सुद्धा या आयोजनाबद्दल आभार व्यक्त करीत अनेक शंकाचे निरसन झाले मात्र त्याबरोबर भावनिक व मानसिक आधार मिळाल्याच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नाशिक मंडळाचे व्यवस्थापक मंगेश गाडे यांनी केले. मेळाव्यात जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपव्यवस्थापक कैलास वारुंगसे, गजानन पोलादे आणि विजय कडाळे तसेच नाशिक ग्रामीण, चांदवड, नाशिक शहर १ आणि २ विभाग येथील मानव संसाधन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.