नाशिक – महावितरणने दिलेल्या सुविधांचा वापर करीत स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्यास महावितरणच्या वीजग्राहकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नाशिक परिमंडलात गेल्या एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मोबाईल अँप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले होते तर मे महिन्यात यामध्ये आठ हजारांनी वाढ होऊन रिडींग पाठविण्यामध्ये नाशिक परिमंडलातील ३०,१४२ वीजग्राहकांचा समावेश झाला आहे.
वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रिडींग पाठविण्याची मूदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी नाशिक परिमंडळात मागील एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये मे महिन्यात जवळपास ४० टक्के संख्येने म्हणजे ८ हजाराने वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अँप, www.mahadiscom.in किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींग पाठविता येत आहे.
महावितरण मोबाईल अँपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येईल.
वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. मीटर रिडींग कसे पाठवावे याबाबत महावितरणच्या तसेच इतर सामाजिक माध्यमावर प्रात्यक्षिकासह व्हिडीओ उपलब्ध आहेत. विविध फायद्यांमुळे या सुविधेचा वापर करून वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.