ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
नाशिक: कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेशक कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. यानुसार थकबाकीदार कृषिपंप धारकांना वीजदेयकाची थकबाकी भरतांना निर्लेखनाद्वारे तथा व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिली आहे. मात्र या योजनेत बिले भरतांना वीज बिले दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणला प्राप्त झाली होती त्यानुसार १० व ११ मार्चला नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय व उपविभागनिहाय महावितरणच्या उपविभागीय कार्यलयांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सदर शिबीर हे गुरुवार १० मार्च रोजी मालेगाव मंडळातील कळवण, मालेगाव, मनमाड व सटाणा विभागाअंतर्गत असलेल्या देवळा, सुरगाणा, दाभाडी, मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, नामपूर, सटाणा या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये होणार आहे. तसेच शुक्रवार ११ मार्च रोजी नाशिक मंडळातील चांदवड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर १ आणि नाशिक शहर २ या विभागाअंतर्गत असलेल्या चांदवड, लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, इगतपुरी, ओझर, पेठ, सिन्नर, सिडको, त्र्यंबकेश्वर, कळवण उपविभागीय कार्यालयात आणि नाशिक शहरात असणाऱ्या सर्व महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये आयोजित केले जाणार आहे.
या कृषी वीजदेयक दुरुस्ती शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी अशा स्वरूपांच्या तक्रांरींचे निराकरण करण्यात येणार असून कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजुरीचे प्रस्ताव संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करून देयक दुरुस्ती नंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे. कृषिपंप वीजधोरणाचा लाभ घेऊन कायम थकबाकी मुक्त होण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे. तरी थकबाकीदार ग्राहकांनी आपली काही शंका व तक्रार असल्यास या शिबिराच्या माध्यमातून लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावे तसेच शिबिरात येतांना कृषिपंप ग्राहकांनी आपले वीजबिल व आवश्यक कागदपत्रे घेऊन यावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.