नाशिक – तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे नाशिक ग्रामीण विभागअंतर्गत येत असलेल्या दुर्गम भागातील सुरगाणा उपविभागातील बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण हे तीन विद्युत उपकेंद्र आणि पेठ उपविभागातील उंबराळे,पेठ, ननाशी आणि करंजाळी हे चार विद्युत उपकेंद्र या उपकेंद्रांना जोडणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर तांत्रिक बिघाड होऊन १७ मे रोजी बंद झाले. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे डोगरघाटात असलेल्या या वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्या तरी महावितरणचे कर्मचारी यांनी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करीत उंबराळे आणि बोरगाव हे उपकेंद्र सुरु केले असून उर्वरित उपकेंद्र सुरु करण्यासाठी यंत्रणा युद्धस्तरावर कार्यरत आहे.
१७ मे २०२१ रोजी तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे १३२ केव्ही दिंडोरी या उपकेंद्रातून जाणारी ३३केव्ही सुरगाणा वाहिनी जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आणि मुसळधार पावसामुळे ३३केव्ही सुरगाणा वाहिनीवर बिघाड होवून बंद पडली. या वाहिनीची एकूण लांबी दिंडोरीपासून ९८ किलोमीटर आहे. त्यामुळे बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण हे तीनही विद्युत उपकेंद्र बाधित झाले. काल बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण या तीनही उपकेंद्राचा पुरवठा पूर्ववत झाला मात्र १७ मी रोजी रोजी पुन्हा संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसानंतर सुरगाना व उंबरठाण उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच या दोन दिवसात हे बंद उपकेंद्र सुरु करण्यात यश मिळवले मात्र वादळी वारा व पावामुळे पुन्हा पुन्हा ते बंद पडत आहेत. उपकेंद्र वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे कामगार यांच्यासह जवळपास ५० जण मुसळधार पाऊस व जोरदार वारा असताना सुद्धा युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. सदर वाहिनी डोंगरघाट व जंगलातून असल्यामुळे कर्मचाऱयांना कामे करताना अडचणी व मर्यादा येत आहेत. पाऊस व वारा थांबल्यानंतर तात्काळ हि उपकेंद्रे सुद्धा सुरु होणार आहेत. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रविण दरोली आणि कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी प्रत्यक्ष आज घटनास्थळी भेट देऊन यंत्रणांची पाहणी केली आहे. तरी ग्राहकांनी संयम बाळगावा व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागाने केले आहे.