महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
नाशिक -कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील ७५८ कोटी ९६ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल १ हजार १४१ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग न घेणाऱ्या व चालू वीजबिलांचाही भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणवरील आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ५० हजार ३२१ शेतकऱ्यांकडे ३ हजार ४५ कोटी ५२ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील ७५८ कोटी ९६ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे ४ कोटी ६२ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे २ हजार २८१कोटीं रुपये सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १ हजार १४० कोटी ९८ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १ हजार १४० कोटी ९८ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३९९ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ८० कोटी १८ लाखांचे चालू वीजबिल व १०१ कोटी २० लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण ३५२ कोटी १६ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.
वीज ग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठीकृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. चालू वीजबिलांचा भरणा करणार नाही अशा कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
३४ हजार ८६४ शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे
या योजनेचा लाभ घेत नाशिक जिल्ह्यातील ३४ हजार ८६४ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे १४३ कोटी ९६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी १९ कोटी १५ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे ७१ कोटी ९८ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे ७१ कोटी ९८ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.