नाशिक: कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० माध्यमातून असलेल्या महाकृषी अभियान या ऐतिहासिक योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग नोंदवून थकबाकीमुक्त झाले पाहिजे. अखंडित व गतिमान सेवेसाठी ही योजना असून आपल्या इतर शेतकरी बंधूना सुद्धा याची माहिती व फायदे सांगून त्यांनाही सहभागी करुन घ्या, या योजनेच्या माध्यमातून नवीन कृषी वीज जोडणी व थकबाकी मुक्तीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. ते महावितरणच्या ओझर उपविभागाकडून चांदोरी येथील चितेगाव फाटा येथे आज सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी आयोजित महाकृषी अभियान अंतर्गत शेतकरी बांधवाच्या ग्राहक संवाद मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यात नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमणकर व सिद्धार्थआप्पा वनारसे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते व्यासपीठावर उपस्थित होते.या मेळाव्यात २७९ शेतकऱ्यांनी वीज बिलापोटी ५१ लाख रुपये चा भरणा केला. या शेतकऱ्यांचा पुष्प देऊन मुख्य अभियंता यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. राज्यात कृषि वर्गवारीची थकबाकी ४५ हजार कोटी रुपये असून या योजनेच्या माध्यमातून व्याज व दंड माफ करून शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम त्यांच्या गावांमध्ये आणि जिल्ह्यांमधील पायाभूत योजनांसाठी सुविधांवर खर्च होणार आहे, यामाध्यमातून आवश्यक तेथे विद्युत उपकेंद्र उभारण्यात येईल. महावितरणचा उद्देश नफा कमविणे नसून ग्राहक सेवा हेच ब्रीद असल्याचे सांगत जनमित्र व अभियंत्यांनी सुसंवाद साधत ग्राहकांच्या संपर्कात असायला हवे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन समस्यां तात्काळ सोडविण्यात याव्या असेही निर्देश मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी यावेळी दिले.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या योजनेत शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे, महावितरण आर्थिक संकटात असून चालू वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले. नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी कृषी धोरण योजनेसंदर्भात विस्तृत माहिती देऊन या योजनेचे फायदे व लाभ शेतकऱ्यांना समजावून सांगितले. योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा असून थकबाकीतून जमा झालेली काही रक्कम आपल्याच गावात विद्युत यंत्रणा उभारणीवर खर्च करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवर व शेतकऱयांनी सुद्धा मनोगते व्यक्त करताना, आजच्या महागाईच्या काळात इतर साधनांच्या तुलनेत शेतकऱ्यांना वीज स्वस्त दरात उपलब्ध असून ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची असून सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, कर्मचाऱ्यांचे कार्य चांगले असून आम्ही त्यांना जनजागृतीसाठी मदत करू असे आश्वासन दिले. वीज बिले भरल्यानंतर आम्हाला विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण व गतिमान सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यासोबतच सूचना ,तक्रारी व अपेक्षा यावेळी मनोगतातून व्यक्त केल्या. मेळाव्याचे प्रास्ताविक व संचालन सहाय्यक अभियंता विशाल मोरे यांनी केले. तर आभार लिपिक दिनेश जोशी यांनी मानले. यावेळी उपकार्यकारी अभियंता किरण जाधव, ओझर उपविभागातील अभियंते, जनमित्र,विविध गावचे सरपंच व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
नाशिक ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या ओझर उपविभागाची एकूण कृषी वीज बिल थकबाकी रुपये १६० कोटी असून कृषी धोरण अंतर्गत सुधारित थकबाकी ६६.४७ कोटी रुपये आहे. नोव्हेंबर पर्यंत एकूण ९ कोटी४९ लाख रुपयांचा कृषी वीज बिलाचा भरणा शेतकऱ्यांनी केलेला आहे. या संवाद व मेळाव्यात सुद्धा शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन एकूण २७९ शेतकऱ्यांनी कृषी धोरण अंतर्गत एकूण ५१ लाख १३ हजार रुपये इतका भरणा केला. तसेच घरगुती व इतर वर्गावरीतील ग्राहकांनी एकूण ३ लाख रुपयेचा भरणा केला. सर्वाधिक कृषी वीज बिल भरणा केलेल्या ग्राहक यामध्ये एकनाथ पांडुरंग फड – ५ लाख ३० हजार, शशिकांत गोविंद फड- २लाख १२ हजार, सोमनाथ बांगर- २ लाख ५ हजार, अनिल घुमरे- १ लाख ४८ हजार आणि निवृत्ती शंकर सानप- १ लाख रुपये चा भरणा केला. यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमांमध्ये या योजनेअंतर्गत वीज देयक भरणा केलेल्या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्य अभियंता यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.