– गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना २० टक्के अनुदान
– वीजबिलात मोठी बचत, सुमारे ४ वर्षांत परतफेडीची संधी
– नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार
मुंबई – महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे. या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट– ४६,८२०, १ ते २ किलोवॅट- ४२,४७०, २ ते ३ किलोवॅट- ४१,३८०, ३ ते १० किलोवॅट- ४०,२९० तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. उदा. या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.