नाशिक – ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दिनांक २८ व २९ ऑगस्टला शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. वीज ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेचवीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येईल व संसर्गापासून बचाव करता येईल. अखंडित वीज सेवेसाठी ऑनलाईन उपलब्ध सुविधांचा उपयोग करून वीज ग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.