नाशिक – महावितरणच्या नाशिक मंडळाच्या अधिक्षक अभियंता पदी मुख्य कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेले ज्ञानदेव पडळकर यांनी आज (१७ ऑगस्ट) प्रभारी अधिक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांच्याकडून अधिक्षक अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सोलापूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता या पदावर कार्यरत होते. महावितरणमध्ये ज्ञानदेव पडळकर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. सांगलीतील विटा विभाग येथे कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत मंडळामध्ये ऑगस्ट १९९७ मध्ये सेवेची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता पदी जत, सांगली व कोल्हापूर उपविभाग येथे सेवा दिली. यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून कोथरूड विभाग, पुणे येथे त्यांनी कार्य केले आहे. यानंतर जानेवारी २०१७ मध्ये सरळ सेवेने त्यांची अधिक्षक अभियंता पदी सोलापूर मंडळात नियुक्ती झाली. ते आज सकाळी नाशिक मंडळात रुजू झाल्यानंतर कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, सर्व संघटना यांनी त्याचे स्वागत केले. मंडळातील सर्व ग्राहकांना निरंतर व अखंडित वीज सेवा देण्याकरिता आणि महावितरणच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता नेहमीच तत्पर व कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.