नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक परिमंडळात वर्षभरात १८ लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत व ही स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांनाच स्वस्त वीज दराचा फायदा मिळेल, असे महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नाशिक शहर जिल्हा कार्यकारिणीने आज महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. सुंदर लटपटे यांच्यासोबत स्मार्ट मिटर मोहिमेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी लटपटे यांनी स्मार्ट मीटर संदर्भात महावितरण कंपनीची भूमिका सांगितली. बैठकीत स्मार्ट मिटर योजनेसंदर्भातील ग्राहकांचे आक्षेप, सूचना आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा झाली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत स्मार्ट मिटर योजनेसंदर्भात सखोल चर्चा झाली.
ग्राहक पंचायतीची भूमिका
इंजि. हिरा जाधव यांनी स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांचे आर्थिक किंवा तांत्रिक नुकसान होणार असेल, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत कायदेशीर मार्गाने या योजनेचा विरोध करेल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ग्राहकांच्या हितासाठी संघटनेची बांधिलकी अधोरेखित केली. ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींनी स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, आक्षेप आणि सूचना मुख्य अभियंत्यांसमोर मांडल्या.
महावितरणचा खुलासा
मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी स्मार्ट मिटर मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत पुढील एका वर्षात सुमारे 18 लाख स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. प्रथम नादुरुस्त मिटर, सरासरी बिल भरणाऱ्या ग्राहकांचे मिटर, तसेच सरकारी, सहकारी संस्था आणि महावितरण कर्मचाऱ्यांचे मिटर बदलण्यास प्राधान्य दिले जाईल. लटपटे यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. मिटर जळाल्यास पाच वर्षांच्या गॅरंटी कालावधीत ते मोफत बदलले जाईल. मात्र, ग्राहकांच्या जास्त लोडमुळे मिटर जळाल्यास सध्याच्या नियमानुसार मीटरची किंमत भरावी लागेल. तसेच, स्मार्ट मीटरच्या वीज नोंदीबाबत आक्षेप असल्यास ग्राहकांच्या अर्जानुसार तपासणी केली जाईल.
टाइम ऑफ द डे (TOD) स्वस्त वीज योजना
मुख्य अभियंत्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या कृषी सौरवीज वाहिनी प्रकल्पांतर्गत दिवसा तयार होणारी आणि शिल्लक राहणारी वीज ‘टाइम ऑफ द डे’ (TOD) टॅरिफ योजनेतून 1 जुलै 2025 पासून ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध होईल. ही सुविधा फक्त स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांनाच मिळेल. त्यामुळे ग्राहकांनी मोफत स्मार्ट मीटर बसवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी पुढे नमूद केले की, जे ग्राहक स्मार्ट मिटर बसवण्यास विरोध करतील, त्यांना भविष्यात स्वतःच्या खर्चाने मीटर बसवावे लागेल. कारण एका वर्षानंतर मोफत स्मार्ट मिटर बदली योजना बंद होण्याची शक्यता आहे.
ग्राहक पंचायतीचे समाधान
मुख्य अभियंता लटपटे यांनी केलेल्या समाधानकारक खुलाशामुळे स्मार्ट मीटर योजना ग्राहकाभिमुख असल्याचे ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींना जाणवले. बैठकीनंतर ग्राहक प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आणि ग्राहकांच्या हितासाठी भविष्यातही अशा चर्चा सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली.
ग्राहकांना आवाहन
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नाशिक जिल्हा अध्यक्ष इंजि. हिरा जाधव यांनी सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवून स्वस्त वीज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ग्राहकांच्या हितासाठी संघटना सतत कार्यरत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष इंजि. हिरा जाधव, वीज समिती अध्यक्ष चंद्रकिशोर हुमणे, उपाध्यक्ष अरविंद दीक्षित, माजी अध्यक्ष अनिल कोल्हटकर, कोशाध्यक्ष कविता ताई राठी, सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नितीन जोशी, संजय जाधव, हेमंत कमलासकर आणि प्रसिद्धी प्रमुख दिनेश भागवत उपस्थित होते.
shaymugale74@gmail.com