मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार (दि. ३०)पर्यंत सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अॅप व www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.
पर्यावरणस्नेही ५ लाख ग्राहकांचा प्रतिसाद –
वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख ३ हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक २ लाख १ हजार २३३ (२.४२ कोटी), कोकण- १ लाख १३ हजार २५४ (१.३६ कोटी), उत्तर महाराष्ट्र- ७० हजार २२६ (८४.२७ लाख), विदर्भ- ६३ हजार ७३१ (७६.४७ लाख) तसेच मराठवाड्यामध्ये योजनेत सहभागी ५५ हजार ३५१ वीजग्राहकांना ६६ लाख ४२ हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.