नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या निर्देशानुसार तथा मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या सेवा पंधरवाड्यामधे महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व तत्पर सेवा देण्याकरिता तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी महावितरणच्या नाशिक परिमंडलअंतर्गत सर्व उपविभागीय कार्यालयामध्ये सोमवारी ५ मे रोजी “ग्राहक सेवा शिबिर ” राबविण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी नवीन वीज जोडणी व नाव बदल या सेवेसह तक्रारींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
शासनाच्या विविध योजनाबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे तसेच विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा, त्याबाबत जागरूकता वाढावी यासाठी २८ एप्रिल ते १५ मे २०२५ पर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा अंतर्गत महावितरणने ग्राहकांसाठी महावितरणच्या नाशिक परिमंडळातील सर्वच उपविभागीय कार्यालयामध्ये सोमवारी ५ मे रोजी शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराअंतर्गत नाशिक परिमंडळातील सर्व उपविभागीय कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत नवीन वीज जोडणी आणि नाव व पत्ता बदल संदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांनी तक्रारी वा सेवेसंदर्भातील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत. यावेळी संबंधित कामाकरिता अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून तक्रारीचे निवारण तसेच या संदर्भात मार्गदर्शन करतील. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.