नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत सर्व उपविभागीय कार्यालयामध्ये वीज बिल दुरुस्ती, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने सोमवार आणि मंगळवार दि.०३ व ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकांकरिता महावितरणच्या सर्वच उपविभागीय कार्यालयामध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
वीज ग्राहकांना यामध्ये नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या ग्राहकांकरीता पंचवटी, सिडको, सातपूर आणि भद्रकाली नाशिक शहर येथील उपविभागीय कार्यालयात शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वीजबील दुरुस्ती,वाढीवभार मंजुरी, मोबाईल क्र. नोंदणी, गो ग्रीन नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती ग्राहकांना देण्याकरिता हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. येथे ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदर्भातील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत.
शिबिराच्या दिवशी संबंधितं कामाकरिता अभियंते, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून तक्रारीचे निवारण तसेच या संदर्भात मार्गदर्शन करतील. तरी ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ चे कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी केले आहे.