विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडाच्या सदनिका टाटा कर्करोग रुग्णालयाला देण्याचा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केल्यानंतर आव्हाड नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्यण घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भोईवाडा परिसरातील बॉम्बे डाइंग परिसरात कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका सवलतीत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्राचाळीचे पुनर्वसन करण्याचे अधिकार म्हाडाला देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने एकीकडे स्वबळाची भाषा सुरू केलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचा टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सरच्या या रुग्णालयाला सदनिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या होत्या. याविरुद्ध शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असा शेरा मारत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयला ब्रेक लावला. म्हाडाच्या इमारतीतील खोल्या कँसरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु हा निर्णय इमारतीतील रहिवाशांना अजिबात भावला नसल्याची तक्रार खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.