मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. आज माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अंडरवल्ड डॅान अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
पाटील हे शरद पवार गटात लवकरच दाखल होणार असून गीता गवळी या सुध्दा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या या दोन्ही घटक पक्षांनी जोरदार फिल्डींग लावली असून त्यांनी प्रबळ उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्याचे ठरवले आहे.
हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पण, ऱाष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपबरोबर युती केल्यामुळे ही इंदापुर विधानसभेची जागा त्यांच्या पक्षाला सुटणार असल्यामुळे त्यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून लवकरच ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे. इंदापुर मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे आहे. त्यांच्या विरोधात आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अंडरवल्ड डॅान अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांची मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली. गवळी या माजी नगरसेविका असून त्यांना भायखळा विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची शक्यता आहे.