इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॅार्म्युला ठरला असून काँग्रेस १००, ठाकरे गट १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गट ८४ जागा तर मित्रपक्ष ४ जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे. या तिन्ही पक्षांनी आपला स्वतंत्र पाहणी अहवाल तयार केला आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नियमीत बैठका सुरु आहे. त्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
आताच्या झालेल्या बैठकीत जवळपास ८० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. १२० ते १३० जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे.. तिढा असलेल्या जागांवर दुस-या टप्प्यात चर्चा केली जाणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जाणार आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्या बैठकीत मुंबई – कोकण आणि त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा झाली. तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून एक एजन्सी नेमून कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे. हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्यात घेतला जाणार आहे. विदर्भातील जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊल त्यावर निर्णय होणार आहे.
या फॅार्म्युलामध्ये मुख्यमंत्रीपदाचा वादही सोडवण्यात आला आहे. त्यात ज्या पक्षाला जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे ठरल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक झाली. त्यात या फॅार्म्युलावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांनी हा फॅार्म्युला सांगितल्याचे बोलले जात आहे.