इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यात वाद सुरू झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा दावा करत असली, तरी निकालापूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
प्रत्यक्षात मतदान संपल्यानंतर ‘एक्झिट पोल’चे निकाल आले. बहुतांश ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ‘एक्झिट पोल’च्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल. हे वक्तव्य खा. राऊत यांनी लगेच फेटाळून लावले. ते म्हणाले, की मी हे मान्य करणार नाही आणि कोणीही हे मान्य करणार नाही. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. पटोले यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
राऊत म्हणाले, की अशा घोषणा काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींतील राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा आणि सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाची घोषणा करावी.