मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे…शिंदेसरकारने केलं काय, जाहिरातीशिवाय दुसरं काय… पिकाला नाही पाणी, मालाला नाही भाव, अरे सरकारा कधीतरी बळीराजाला पाव… महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत आजही शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारला सळो की पळो करून सोडले.