इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या उपस्थितीत मुंबईत जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला. ‘महाराष्ट्रनामा’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहिरनाम्यात अनेक योजना आणि सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. खर्गे म्हणाले, की महाविकास आघाडीने महाराष्ट्रासाठी पंचसूत्री हमी जाहीर केली आहे. आमच्याच योजनांची कॉपी करून आम्हालाच नावे ठेवणारे लोक आता त्या योजना लागू करत आहेत, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
खर्गे यांनी आपल्या भाषणात सांगितले, की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. काँग्रेस सरकारकडून कर्नाटकमध्ये महिलांना ३००० रुपये दिले जात असताना पंतप्रधानांनी त्याला ‘रेवडी कल्चर’ म्हटले आणि महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू केली. आम्हाला नावे ठेवून योजनांची कॉपी करून आमच्यावरच टीका करतात. महाराष्ट्रनामात महिलांना मोफत बस प्रवास, भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत ३००० रुपये महिना, तसेच, ६ गॅस सिलेंडर प्रत्येकी ५०० रुपयांत आदी सवलती दिल्या जातील. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेत घेणार आणि त्यांचा निकाल ४५ दिवसांत लावणार असल्याचे तसेच राज्य सरकारच्या अडीच लाख जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करणार असल्याची घोषणा ‘महाराष्ट्रनामा’त करण्यात आली आहे.
खर्गे म्हणाले, की आमच्या सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली होती. आताही आम्ही शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंचे कर्ज माफ तर नियमित कर्जफेडीस पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर सूट देणार आहोत. याशिवाय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, मुलांना सुविधा देण्यासाठी आढावा घेऊन लागू योजनांमध्ये सुधारणा करण्यात येतील. शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी वचनबद्ध राहू तसेच पीकविम्याच्या जाचक अटी काढून विमा योजना सुलभ करणार असल्याचेही जाहीरनाम्यात सांगण्यात आले.
जाहीरमान्यात प्रसिद्ध करण्यात आले, की महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार असून अनुसूचित जाती व आदिवासी विभागांचे हक्काचे बजेट निर्धारित करून विशिष्ट कालमर्यादेत खर्च होण्यासाठी कायदा केला जाणार आहे. विविध समाजघटकांसाठी जाहीर झालेल्या सर्व नव्या महामंडळांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी तातडीने दिला जाणार असल्याचे तसेच संघटित व असंघटित सफाई कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन केले जाणार आहे. सामाजिक न्यायाअंतर्गत ‘संजय गांधी निराधार योजने साठीची उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरून वाढवून ५० हजार रुपये केली जाणार आहे. योजनेच्या लाभाची रक्कम दीड हजारांवरून वाढवून दोन हजार रुपये केली जाणार आहे, त्यामुळे याचा लाभ जास्त लोकांना होणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले. तसेच वृद्ध कलाकारांचे मानधन वाढविले जाणार असून शिवभोजन केंद्रांची संख्यादेखील वाढवली जाणार आहे, असे ते म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणार असून दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांचे शंभर युनिटपर्यंतचे वीजबिल दरमहा माफ करणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले. याशिवाय वीज ग्राहकांचा प्रीपेड मीटर योजनेला होत असलेला विरोध पाहून त्याबाबत ही आढावा घेतला जाणार आहे.