इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात येत आहे. ‘कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घोषणेवरून भाजपवर टीकास्र सोडले आहे. ते म्हणाले, की सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहे. अर्थात तेच जातीयवादी आहेतच; पण या घोषणेने ते अधोरेखित केले आहे. निवडणुका येतात आणि जातात; पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करता कामा नये; पण त्याचे भान भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांना नाही, अशी टीका पवार यांनी केली.
शिवसेनेचे पक्षप्रमुऱ उद्धव ठाकरे यांनीही या घोषणेवरून भाजपला लक्ष्य केले. एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, की भाजपचे लोक आता ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहेत; मात्र आम्ही कुणाला कापूही देणार नाही आणि कुणाला महाराष्ट्र लुटूही देणार नाही.
दरम्यान, भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ला काँग्रेसने ‘जुडेंगे तो जितेंगे’ या घोषणेने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडून वातावरणनिर्मितीसाठी या घोषणेचा वापर केला जातो आहे. त्यामुळे भाजपच्या या घोषणेला काँग्रेसकडून ‘जुडेंगे तो जितेंगे’या घोषणेने प्रत्युत्तर दिले जाईल, असे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले
भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’या घोषणेपासून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या राज्यात अशा घोषणांना काहीच अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.