इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः ‘इंडिया’ आघाडी महाराष्ट्रात तेलंगणा आणि कर्नाटकचा विजयी फॉर्म्युला अजमावत आहे. महिलांना आकर्षित करण्यासाठी आघाडीने मोफत बससेवेचे आश्वासन दिले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना ही सुविधा मिळणार आहे.
‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने कर्नाटकातही असेच वचन दिले होते. जनतेनेही त्यावर मतदान केले. आज राज्यात त्यांचे सरकार आहे. दक्षिणेतील तेलंगणामध्येही असेच वचन देण्यात आले होते. राज्यातील काँग्रेस सरकार महालक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर्सना मोफत बस प्रवासाची सुविधा देत आहे. तेलंगणापूर्वी दिल्ली सरकारने राज्यातील महिलांसाठी मोफत बससेवेची योजना सुरू केली होती. ही सेवा अजूनही सुरूच आहे. कर्नाटकात महिलांना मोफत सेवा देणे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला महागात पडले. त्याच्यावरचा भार वाढला. भाडे वाढवण्याचीही चर्चा होती. यापूर्वी २०१९ मध्ये भाडे वाढवले होते. त्यावेळी डिझेलचा दर प्रतिलिटर ६० रुपये होता, तो आता ९९ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय सुट्या भागांच्या किमतीही वाढल्या आहेत. वेतन सुधारणेसाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.
‘एनडीए’ ही महिलांना आकर्षित करण्यासाठी मोफत बस सेवेची सुविधा देत आहे. आंध्र प्रदेशात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेत आंतरराज्य प्रवासाच्या तरतुदींचाही समावेश आहे. मोफत प्रवास आंध्र प्रदेशच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे, प्रवासी एक्स्प्रेस आणि पल्ले वेलुगू बसमध्ये कोणत्याही भाड्याशिवाय राज्याच्या सीमेवर जाऊ शकतात.