मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन मतदान यादीतील संदिग्धता, ऑनलाइन फॉर्म ७ द्वारे अर्ज नाकारणे, मतदान सुरळीतपणे पार पडणे, मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा इ. विषयांवर सविस्तर चर्चा केली.
शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, आ. धीरज लिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.