विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने एकीकडे स्वबळाची भाषा सुरू केलेली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यांचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तपासणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससच्या नेत्यांशी चर्चा न करताच परस्पर स्थगिती दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तेच टाटा कॅन्सरच्या या रुग्णालयाला सदनिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या होत्या. याविरुद्ध शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असा शेरा मारत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयला ब्रेक लावला. म्हाडाच्या इमारतीतील खोल्या कँसरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु हा निर्णय इमारतीतील रहिवाशांना अजिबात भावला नसल्याची तक्रार खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
दुर्दैवी निर्णय
दरम्यान, बाहेर गावाहून येणा-या कॅन्सरपीडित रुग्णांच्या नातेवाईकांची सोय व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता. या निर्णयाला स्थगिती मिळणे दुर्दैवी बाब आहे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. कुठलाही निर्णय घेताना त्याची पूर्वकल्पना देतो. याबाबत गैरसमज झाले असावेत, आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
काय होता निर्णय
परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्ण उपाचारासाठी येतात. अनेक रुग्ण गरीब असल्याने रुग्ण किंवा त्यांच्या नोतेवाईकांसाठी राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रुग्णलयाच्या आजूबाजूच्या परिसरात मिळेल तिथे ते राहतात. यावर अखेर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन म्हाडाच्या शंभर सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी देण्याचा निर्णय घेतला होता.