मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली. या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रा समवेत लावण्यात यावीत अशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भुजबळांनी याबाबत चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तत्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार नुकताच शासन निर्णय देखील काढण्यात आला होता. त्यानुसार आज महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले सदर ऐतिहासिक तैलचित्र आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी,प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.
Mahatma Phule Savitribai Phule Tailchitra in Mantralaya