आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले योजना
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यात एकत्रित राबविण्यात येत आहे. ही योजना गरीबांसाठी वरदान ठरत आहे.
- श्वेता पोटुडे-राऊत (माहिती अधिकारी, नांदेड)
1 एप्रिल 2020 पासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत अनेक दुर्धर आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयात संगणीकृत नोंदणी केल्यानंतर उपचार दिला जातो.
शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शिधापत्रिका, सात/बारा उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्चाचा यात समावेश आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिकुटुंब 1 लाख 50 हजारापर्यंत विमा संरक्षण मिळते. मुत्रपिड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाख रूपये आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रतिकुटुंब 5 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 वरील उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान-भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरूपात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलात आली आहे. कोविड-19 रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक भार पडू नये तसेच कोविड-19 महामारीच्या संकटात नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी म्युकरमोकोसिस आजारांचा यात समावेश करण्यात आला आहे.
महात्मा जोतिराव फुले या योजनेतंर्गत सर्वसाधारण शस्त्रक्रिया, कान, नाक घसा शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया, पोट व जठर शस्त्रक्रिया, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया, मज्जातंतूविकृती शास्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडिओथेरपी कर्करोग, त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभाल, जनरल मेडिसिन, संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, न्युरोलॉजी, पल्मोनोलॉजी, चर्मरोग चिकित्सा, रूमेटोलॉजी, इंडोक्रायनोलॉजी, मेडिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, इंटरव्हेन्शनल रेडीओलॉजी या शस्त्रक्रियेचा यात समावेश करण्यात आला आहे.