विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविड-१९ या महामारीत ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी व्यवसायासाठी कर्ज देण्याची and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किमान एक ते पाच लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.यामध्ये एनएफडीसी दिल्लीचा ८० टक्के सहभाग असून भांडवली अनुदान २० टक्के मिळणार आहे. या योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असणार आहे.
या योजनेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये ३.०० लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे, मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता महानगरपालिका अथवा नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र या तिन्हीपैकी एक दस्तावेज असणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (३.०० लाखा पर्यंत) कोविड- १९ मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या कार्यालयात अथवा या लिंकवर https://forms,gle/7miG8C MecLkn WG16K7 भरण्यात यावी. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुख्य कार्यालय, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं ९, जे.व्ही.पी.डी.स्कीम जुहू मुंबई ४०००४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर व उपनगरचे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी पत्रकाद्वारे केले आहे.