देशातील सर्वांत मोठ्या शिवमूर्ति!
आधुनिक काळातील १२ ज्योतिर्लिंग
आपल्या देशांत महादेवाच्या मंदिरांची परंपरा अतिशय प्राचीन आहे. केदारनाथ पासून रामेश्वरम पर्यंत अनेक मोठी पवित्र शिव मंदिरं सर्वांना माहित आहेत. परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षांत देशांत अनेक ठिकाणी भगवान शंकरांच्या मोठ मोठ्या मूर्ती तयार होत आहेत.या मुर्तींचीही अनेक वैशिष्ट्य आहेत आणि या मुर्तींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पर्यटक आवर्जून जातात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेली ही आधुनिक श्रद्धास्थानं भाविकांच्या मनांत घरं करीत आहेत. पूर्वीची मंदिरं राजे महाराजे बांधत असत.हल्लीची ही पूजनीय स्थानं आपल्या सारखी सामान्य माणसं तयार करतात. आजही आपल्या देशांत सर्वांत जास्त शिव मंदिरं बांधली जातात. एवढच नाही तर या भोळया शंकरा वरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शिवाच्या मोठ मोठ्या मूर्ती अनेक भक्त अनेक ठिकाणी स्थापन करतात. या मूर्तींची भव्यता,अवाढव्य आकार पहिल्या नंतर आपल्याला भगवान शंकराला महादेव का म्हणतात हे मनापासून पटते.आणि तोंडातून शब्द बाहेर येतात, ‘अबब! केवढा मोठ्ठा आहे हा महादेव’! आजवर आपण जगभरातील भगवान शंकराची मंदिरं तसेच सुप्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंग या विषयी अनेक वेळा वाचले असेल ऐकले असेल. आज मराठीत प्रथमच देशांतील सर्वांत मोठ मोठ्या १२ महादेव मुर्तींची माहिती आपण पाहणार आहोत.
१) ५८ फुटी गंगाधरेश्वर (आज्झिमाला समुद्रकिनारा, केरळ)
एखादया शास्त्रांत पारंगत असल्यावर एखाद्या व्यक्तीने मोठा विक्रम केला तर ते समजू शकते परंतु कोणत्याही शास्त्राची माहिती नसतांना ; कोणत्याही विषयाचा अभ्यास नसतांना केवळ आपल्याला एखादा जागतिक विक्रम करायचा आहे असे म्हणून ते अशक्य वाटणारे कार्य पूर्ण करणे केवळ कथा कादंबरी किंवा चित्रपटातच शक्य असते. पण असे अशक्य ते शक्य करून दाखविले आहे ‘देवदाथन’ नावाच्या केरळी युवकाने. आज २९-३० वर्षांचे वय असलेल्या देवदाथान याने केरळ मधील सर्वांत उंच भगवान शंकराची मूर्ती तयार केली आहे. शिल्पकलेचा गंध नसतांना, घरातल्या सात पिढ्यात कुणी साधा मातीचा गणपती सुद्धा बनविला नसेल अशा घरातील मुलाने चक्कं जगभर फेमस होईल अशी शिवाची दगडी मूर्ती तयार केली. केरळ मधील आज्झिमाला शिवमंदिर समुद्राच्या काठावर आहे. येथील समुद्र किनार्यावरील दगडी खडकांवर भगवान शिवाची ५८ फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली आहे.
२) ६१ फुटी बेलेश्वर महादेव (भंजनगर ओरिसा)
ओरिसातील गंजम जिल्ह्यांत भंजनगर जवळ ‘रसेल कोंडा’ नावाचा एक मोठ्ठा तलाव आहे. या तलावाकाठी वसविलेले बिजू पटनाईक चिल्ड्रन्स पार्क केवळ ओरिसातच नाही तर सर्व देशांत प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी भगवान शंकराची ६१ फूट उंचीची भव्य मूर्ती तयार करण्यात आल्यामुळे पर्यटकासाठी तसेच शिव भक्तांसाठी हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आले आहे. भंजनगरच्या एरिगेशन विभागातील कर्मचारी व अधिकार्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतुन भगवान शंकराची ६१ फूट उंचीची मूर्ती घडविली. खरं तर सरकारी खात्यातील कर्मचारी वर्गाची नेहमी अवहेलना केली जाते. त्यांच्यावर टीकेची एकही संधी समाज आणि मिडिया कधी सोडत नाही. परंतु भंजनगर एरिगेशन विभागाचे कर्मचारी याला अपवाद आहेत. भंजनगर एरिगेशन डिव्हिजन एम्प्लॉइज कल्चरल असोशिएशन ही त्यांची मान्यताप्राप्त रजिस्टरर्ड संस्था असून या संस्थेच्या माध्यमातुनाच त्यांनी हा विक्रम केला आहे.
३) ६५ फुटी शिवोहम शिव महादेव (बंगळुरू, कर्नाटक)
बंगळुरू येथील सुप्रसिद्ध शिवोहम शिव मंदिरातील ६५ फूटी भगवान शंकराचे दरवर्षी किमान ५ लाख भाविक दर्शन घेतात. वर्षी २७ वा महोत्सवी महाशिवरात्रोत्सव साजरा करणार्या या महाकाय शिव मुर्तीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. बंगळुरुच्या जुन्या एअरपोर्ट रोड वरील केम्पा फोर्ट परिसरांत हे शिवमंदिर १९९५ साली स्थापन करण्यात आले. कर्नाटकातील सुप्रसिद्ध मूर्तिकार काशीनाथ यांनी भगवान शिवाची ही ६५ फूटी मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तयार करण्या पूर्वी कोणत्याही प्रकारची ब्ल्यू-प्रिंट किंवा नकाशा तयार करण्यात आला नाही. एवढंच नाही तर या मुर्तीची मापे मोजण्यासाठी कोणताही मेजरिंग टेप वापरण्यात आला नाही असे सांगितले जाते. तसे असेल तर हेदेखील एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
४) ७६ फुटी कचनार सिटी महादेव (जबलपूर, मध्य प्रदेश)
एका ज्योतीने पेटविलेली दुसर्या दिव्याची ज्योत प्रज्वलित होते आणि मग दोन्ही ज्योती प्रकाशने उजळून जातात. हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु एखादी आश्चर्यचकित करणारी भव्य मूर्ती पाहून आपणही आपल्या गावात अशीच विशाल मूर्ती घडवावी अशी प्रेरणा घेउन एखादी व्यक्ती आपल्या गावात प्रेरणा देणार्या मूर्ती पेक्षाही मोठी मूर्ती घडवितो असे उदाहरण आपल्याला कदाचित ठावुक नसेल.
जबलपुर येथील कचनार सिटी शिव मंदिरांत भगवान शंकराची ७२ फूट उंच शिवमूर्ति घडविणारया अरुण कुमार तिवारी यांच्या बाबतीत हा किस्सा असाच घडलाय.बेंगलुरुची भव्य शिवमूर्ती पाहूनच त्यांनी जबलपुरची शिव मूर्ती तयार केली आहे. भारतातील सर्वाधिक उंचीच्या भगवान शंकराच्या मूर्तीं मध्ये कचनार सिटी शिव मुर्तीचा समावेश केला जातो. मध्य प्रदेशातील जबलपुरच्या विजय नगर येथील कचनार सिटीत असलेली ही शिव मूर्ती 76 फूट उंच आहे. एवढी उंच आणि भव्य मूर्ती तयार करण्यासाठी करागिरांना अनेक वर्षे लागली.
५) ८५ फुटी नागेश्वर शिवमूर्ती (नागेश्वर, गुजरात)
बारा ज्योतिर्लिंगातील दोन ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये आहेत. ज्योतिर्लिंगांच्या सुप्रसिद्ध श्लोकातील पाहिले ‘सोमनाथ’ आणि दहावे ‘नागेश्वर’ ही दोन ज्योतिर्लिंगे गुजरातमध्ये आहेत. शिवभक्तांना ही दोन्ही ज्योतिर्लिंग सारखीच पूजनीय असली तरी आज आपण ‘जगातील सर्वांत मोठ्या शिवमूर्ती!’ या विशेष मालिकेत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व जाणून घेणार आहोत. याचे कारण म्हणजे देशांतील सर्वांत उंच शिवमुर्तींमध्ये समाविष्ट असलेली २५ मीटर म्हणजेच ८२ फूट उंचीची महादेवाची मूर्ती येथे स्थापन करण्यात आलेली आहे.
टी-सेरिज या कॅसेट कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या मुळे’ वैष्णो देवी’ या स्थानाला देशभर प्रसिद्धी मिळाली हे सर्वज्ञात आहे. पण याच गुलशन कुमार यांच्या भरघोस देणगीतून गुजरात मधील नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराच्या प्रांगणात देशातील सर्वांत मोठी शिव मूर्ती देखील तयार करण्यात आली हे अनेकांना माहित नाही.
६) ८५ फुटी शिवगिरी महादेव (बिजापूर, कर्नाटक)
कर्नाटकातील ‘बिजापुर’ जवळ असलेल्या कंदुका पहाडावरील मुरुदेश्वर मंदिरांत भगवान शंकरांची थोड़ी थिडकी नाही तर चक्कं ८५ फूट उंच असलेली मूर्ती ‘बिजपुरचा शिवगिरी महादेव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ध्यानस्थ बसलेली भगवान शिवाची ही साधना मुद्रेतील अवाढव्य मूर्ती पाहून भाविक या मुर्तित दंग न झाला तरच नवल! भगवान शिवाची ही ८५ फूट म्हणजेच सुमारे २६ मीटर उंच शिवमुर्ती बिजापुरच्या सुप्रसिद्ध टी.के. पाटील चैरिटेबल ट्रस्ट यांनी बिजापुर (विजयापूर) येथे तयार करवून स्थापन केली आहे. बिजापूरच्या ‘संदगी रोड’ वर ही मूर्ती पहायला मिळते. हे नवीन धार्मिक ठिकाण हळूहळू नावारुपाला येत आहे. १५०० टन वजनाची ही शिवमूर्ती देशातील दुसरी सर्वांत मोठी आणि वजनदार मूर्ती असल्याचे मानले जाते. शिमोगा येथील शिल्पकाराने १३ महिने रात्रंदिवस अथक काम करून ही मूर्ती घडविली. बिजापुर पासून जवळच असलेल्या बसंत वनांत उभारलेली ही शिव मूर्ती ८५ फूट उंच असून स्टील आणि सिमेंटचा उपयोग करून ही मूर्ती घडविली आहे. देशांतील सर्वांत उंच १० शिवमूर्तींमध्ये ‘शिवगिरी महादेव शिव मूर्ती’चा समावेश केला जातो.
७) १०१ फुटी शिवशंभो (हरिद्वार, उत्तर प्रदेश)
जगातील मोठ मोठ्या भगवान शिवाच्या मुर्तींचा विषय सुरु आहे आणि अजून हरिद्वारचं नाव नाही असं कसं होईल? जिथे साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश म्हणजे भगवान शंकर यांचा सदैव निवास असतो त्या हरिद्वार मध्ये भगवान शिवाची मूर्ती असणार नाही असं कधी होईल का? ‘हरी की पौड़ी’ या घाटापासून हाकेच्या अंतरावर भगवान शंकरांची १०१ फूट उंचीची मूर्ती आहे. हरिद्वार येथील गंगेवरील पाईप आणि तारा यांच्या आधाराने तयार करण्यात आलेल्या ओव्हर ब्रिज वरून ‘हरी की पौड़ी’ला येतांना दोन-तीन कि.मी.अंतरावरुनच भगवान शंकराची जगातली उंच मूर्ती दिसू लगते. देशातल्या इतर भव्य शिव मूर्ती आणि हरिद्वारची शिव मूर्ती यात दोन विशेष गोष्टी आढळतात. एक म्हणजे इतर ठिकाणच्या बहुतेक शिवमूर्ती ध्यानस्थ बसलेल्या आहेत. तर येथील शिवमूर्ती उभी आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवाला दोनच हात दाखविलेले आहेत. इतर अनेक ठिकाणी शिवमूर्तीला चार हात दाखविलेले दिसतात.
येथील शिवाची मूर्ती १०१ फूट उंच आहे. येथील भगवान शंकर उभे असून त्यांच्या डाव्या हातात त्रिशूल आणि त्यालाच जोडलेले डमरू आहे.भगवान शिवाच्या जटेत गंगा बसलेली असून कपाळावर चंद्रकोर शोभून दिसते. शिवाच्या गळ्यात नाग आणि रुद्राक्ष माला रुळत आहेत. येथे शिवाने कमरे भोवती व्याघ्रजीन परिधान केले असून त्याच्या कमरे भोवती दोन नाग दाखविलेले आहेत.
८) १०१ फुटी मंगल महादेव (नवी दिल्ली)
देशाच्या विविध भागांत भगवान शिवाच्या उंच आणि भव्य मूर्ती तरुण पिढीच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत आहे. राजधानी दिल्लीतही १०१ फूट उंचीची भगवान शंकरांची भव्य मूर्ती देशी आणि विदेशी पर्यटकाचे लक्ष्य वेधून घेते आहे. कारण दिल्ली एअरपोर्ट जवळच हे प्रसिद्ध मंदिर आहे. दिल्ली एयरपोर्टच्या जवळ मंगल महादेव नावाचे एक अतिशय आकर्षक मंदिर आहे. दिल्ली चेन्नई हाय-वे क्रमांक 48 (जुना हाय-वे क्रमांक 8) वर दिल्ली – गुरगांव रोडवर नवी दिल्ली एयरपोर्ट समोर विरूद्ध दिशेला भगवान शिवाची १०१ फूट उंचीची विशाल मूर्ती रोडवरून येणार्या जणारांचे लक्ष वेधून घेते. हाय-वे पासून अवघ्या अर्ध्या मिनटाच्या ड्रायव्हिंग नंतर एवेन्यू बोगेनवेलिया उर्फ़ “मंगल महादेव मंदिर” दृष्टीस पड़ते. मंदिरा बाहेर बोर्ड वर मंदिराचे नाव लिहिलेले आहे – ‘मंगल महादेव मंदिर’, रंगपुरी, दिल्ली.
९) १०८ फुटी भगवान शिव (नामची, सिक्कीम)
आपल्या देशांत अनादि काळापासून भगवान शिवाची पूजा केली जाते.त्यामुळेच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारके पासून आसाम पर्यंत सर्वत्र भगवान शंकरांची शंभर शंभर एकर जागेवर वसलेली अति भव्य मंदिरं आणि जणू आकाशाला भिडलेल्या प्रचंड मोठ मोठ्या शिव मूर्ती पहायला मिळतात. भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या दुर्गम सिक्किमचा देखील याला अपवाद नाही. सिक्किमच्या नामची प्रांतातील सोलोफोक पहाडावरील सुप्रसिद्ध चारधाम मंदिर आणि येथील हिमालयातील पहाडावर स्थापन केलेल्या भगवान शिवाच्या १०८ फूट उंचीच्या शिवमुर्ती प्रसिद्ध आहे. नामची जवळच्या सोलोफोक पहाडाला थेट महाभारत काळाची पार्श्वभूमी लाभली आहे. महाभारतातील महायुद्ध होण्यापूर्वी अर्जुनाने भगवान शिवा पासून पशुपति अस्त्र मिळविले तो प्रसंग सोलोफोक पहाडावर घडला. अर्जुनाने येथे चारधाम मंदिरं बांधली असे म्हणतात. याच पवित्र ठिकाणी २०११ च्या महाशिवरात्रीला जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते भगवान शिवाच्या १०८ फूट उंचीच्या महाकाय शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.तेंव्हापासून येथे भाविक आणि पर्यटक यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या राज्याच्या पर्यटन विभागाने जाणीव पूर्वक सूक्ष्म नियोजन करून एखाद्या प्राचीन धार्मिक क्षेत्राचे आधुनिक पर्यटन स्थळांत रूपांतर केल्याचे हे एक आदर्श उदाहरण म्हणता येईल.
१०) ११२ फुटी आदियोगी शिव (कोईम्बतूर, कर्नाटक)
सध्या आध्यात्मिक गुरुंमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले धार्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या कल्पनेतून कोईम्बतुर येथे भगवान शंकरांची ११२ फूट उंच शिव मूर्ती २०१७ साली साकार करण्यात आली आहे. येथे भगवान शिवाचा केवळ मुखवटा ११२ फूट उंच बनविण्यात आला आहे. भारतीय योग शास्त्राचा जगभर प्रचार प्रसार व्हावा यासाठी आदियोगी शिव मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. आणि या मुर्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतल्या मुळे त्यांचा हा उद्देश बहुतांशी सफल झाला आहे. या मूर्ती पेक्षा मोठ्या शिव मूर्ती जगात आहेत.परंतु येथील आदियोगी शिवाचा फक्त मुखवटाच गळा,चेहरा आणि डोक्यावरील जटा यांची उंची ११२ फूट आहे. शिवाची लांबी ४५ मीटर (१४७ फूट) आणि रुंदी २५ मीटर (८२ फूट) आहे. संपूर्णपणे स्टील पासून तयार करण्यात आलेल्या या आदियोगी शिव मूर्तीचे वजन ५०० टन आहे. हे जागतिक रेकॉर्ड झाले आहे. भगवान शिवाला योगाचा प्रवर्तक मानतात. त्यामुळेच या विशाल आकाराच्या शिवमूर्तीला आदियोगी म्हणजे पहिला योगी असे नाव देण्यात आले. कोईम्बतुर येथील आदियोगी शिवाच्या ३४ मीटर म्हणजेच ११२ फूट उंचीच्या शिव मूर्तीची प्रतिष्ठापना २४ फेब्रुवारी २०१७ या दिवशी करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आदियोगी शिव प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.
११) १२० फुटी सर्वेश्वर महादेव (वडोदरा, गुजरात)
भगवान शंकरांच्या जगभरातील शंभर फुटांपेक्षा उंच मूर्ती मध्ये वडोदरा येथील मूर्ती सर्वांधिक प्रसिद्ध आहे. आजच्या घडीला ही जगातली सर्वांत किंमती महादेव मूर्ती मानली जाते कारण या मूर्तीला चार वर्षांपूर्वी सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. या मुर्तीची लोकप्रियता एवढी अफाट आहे की परदेशातील मॉरीशस येथील भाविकांनी वडोदरा येथील सर्वेश्वर महादेव मुर्तीचीच हुबेहूब प्रतिकृती त्यांच्या येथील ‘गंगा तलाव’ येथे स्थापन करुन या शिवमूर्तीला वन्समोअर दिला आहे. सर्वेश्वर महादेव नावाने जगभरातील शिवभक्तांत प्रसिद्ध असलेली ही जगातील सर्वांत उंच सुवर्ण लेपन केलेली शिव मूर्ती गुजरात मधील वडोदरा शहराच्या मध्यभागी असलेल्या ‘सुरसागर लेक’ या तलावाच्या मध्यभागी वड़ोदरा महानगर सेवा सदन या संस्थेने २००२ मध्ये ३७ मीटर म्हणजे १२० फूट उंचीची शिव मूर्ती स्थापन केली आहे. भगवान शंकराची सर्वेश्वर महादेव नावाने जग प्रसिद्ध झालेली ही मूर्ती तयार करण्यासाठी सहा वर्षे लागली. १९९६ मध्ये ही मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आणि २००२ मध्ये तिची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. तलावाच्या मध्यभागी ७८ फूट खोलीच्या २३ खांबावर सर्वेश्वर महादेव मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. स्टील , तांब्याच्या पटटया आणि सिमेंट कॉन्क्रीट पासून ही मूर्ती घडाविण्यात आली आहे. २०१८ मध्ये सोन्याचा मुलामा देण्यासाठी ही मूर्ती पुन्हा चर्चेत आली.
१२) १२३ फुटी मुरुडेश्वर शिव (मुरुडेश्वर, कर्नाटक)
मुरुडेश्वर नावाने प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे शिव मंदिर अरबी समुद्राच्या किनार्यावर उभारण्यात आलेल्या भगवान शंकराच्या महाकाय मूर्ती मुळे आता जगप्रसिद्ध झाले आहे. मुरुडेश्वर येथे भगवान शंकरांची पद्मासनात बसलेली मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मुर्तीची उंची १२३ फूट आहे. भगवान शंकरांची ही आपल्या देशातील दुसरी तर जगातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी शिवमूर्ती आहे. या शिवमूर्ती पेक्षा फक्त दोनच शिवमूर्ती मोठ्ठ्या आहेत. मुरुडेश्वर येथील १२३ फूट उंचीची भगवान शंकराची जगातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत उंच मूर्ती अरबी समुद्रातूनही खूप दुरून दिसते. शिवमोगा येथील मूर्तिकार काशीनाथ आणि त्यांच्या सहकारी कारागीरांनी ही मूर्ती दोन वर्षांत तयार केली. स्थानिक बांधकाम व्यावसायिक आर.एन.शेट्टी यांनी सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून ही शिवमूर्ती तयार करविली. २००६ च्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी चतुर्भुज भगवान शंकर पद्मासनात बसलेले असून त्यांचा पुढचा उजवा हात आशिर्वाद दर्शक असून डाव्या हातांत जपमाल आहे. शिवाच्या मागच्या उजव्या हातांत त्रिशूल असून मागच्या डाव्या हातांत डमरू धारण केले आहे. भगवान शंकरांच्या डोक्यावर जटा असून त्यावर गंगा आणि चंद्र विराजमान झालेले आहेत. शिवाच्या गळ्यात रुद्राक्ष माला आणि नाग असून कमरे भोवती देखील नागबंध आहे. भगवान शिव व्याघ्रजिनावर बसलेले असून त्यांनी कमरे भोवती वल्कले परिधान केली आहेत. मुरुडेश्वर शिवाची ही मूर्ती इतकी भव्य आणि विशाल आहे की तिचे विशाल रूप पाहून मनुष्य चकित होतो. सागराच्या आणि भगवान शिवाच्या या विशालत्वा समोर आपले क्षुद्रत्व तत्काल जाणवते आणि भक्ती भावनेने मनुष्य नतमस्तक होतो.
१३) जगातली सर्वांत उंच शिव मूर्ती : ३५१ फुटी स्टॅच्यु ऑफ बिलिफ (नाथद्वार, राजस्थान)
नमनाला घडाभर तेल वाया न घालविता मी पहिल्यांदाच सांगतो, भगवान शंकरांची जगातली सर्वांत उंच मूर्ती आपल्या देशांतच आहे. राजस्थान मधील उदयपुर पासून ६२ किमी अंतरावर असलेल्या नाथद्वार येथे तयार करण्यात आलेली भगवान शंकराची ही मूर्ती जगात सर्वांत मोठ्ठी आहे. ३५१ फूट उंचीच्या या शिव मूर्तीला ‘स्टॅच्यु ऑफ बिलिफ’ म्हणजे ‘विश्वासाची मूर्ती’ असे म्हणतात.’ मिराज ग्रुप’ चे संचालक मदनलाल पालीवाल यांनी ही शिव मूर्ती तयार केली आहे. तर अशी आहेत ही आधुनिक १२ ज्योर्तिर्लिंग स्थाने. विशेष म्हणजे या पैकी प्रत्येक महादेव शिवमुर्तींचा वर्धापन दिन आजच महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा केला जातो. आणि याप्रत्येक महादेव मूर्तीच्या दर्शनाला प्रत्येकी किमान एकेक लाख भाविक जमतात.