रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग असुन गंगागोदावरीचे उगमस्थान आहे. तिर्थराज कुशावर्तात सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्नानाचे महत्व आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे संजीवन समाधीचे स्थान महात्म्य आहे. अशा या तिर्थक्षेत्री महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे. शनिवार १८ मार्च रोजी महाशिवरात्र पर्वकाळ आहे. महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शनिवार दि. १८/०२/२०२३ रोजी सकाळी ४ वाजेपासून रविवार दि. १९/०२/२०२३ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील.
महाशिवरात्री निमीत्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांची श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करुन सजविण्यात येणार आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, इ. ठिकाणी फूलांची सजावट करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात येणार आहे. दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे.
महाशिवरात्री उत्सवा निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे ३ दिवसांकरीता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये दि. १७/०२/२०२३ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत प्रसिद्ध सितार वादक पं. निलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा कार्यक्रम व रात्री ७.३० ते ९ वाजेपर्यंत ओम नटराज अॅकडमी तर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांनी केलेले आहे. दि. १८/०२/२०२३ रोजी महाशिवरात्री निमित्त दुपारी २ वाजता रा. स्व. संघ, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने घोष वादन, तसेच सायं. ५ :३० वाजता बासरी प्रशिक्षण वर्ग नाशिक यांचा समूह बासरी वादनाचा कार्यक्रम व सायं. ७:३० ते ८:३० यावेळेत किर्तनकार ह.भ.प. चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुस्ती हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.
दि. १९/०२/२०२३ रोजी सायं. ७ ते ९ यावेळेत पद्मविभूषण पं. जसराज यांचे पटशिष्य पं. प्रसाद दुसाने यांचा सुगम संगिताचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. सदर सर्व कार्यक्रम हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मर्यादीत संख्येत शिवप्रेमींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याच बरोबर परंपरेनुसार दि. १८/०२/२०२३ रोजी दुपारी ३ वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपारिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त कुंडावर षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दि. १८/०२/२०२३ रोजी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी ०५.०० वाजता करण्यात येणार आहे.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे भगवान श्री त्र्यंबकराजांची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री १२:०० ते ०२:३० या वेळेत होणार आहे. ग्रामस्थांच्या दर्शनासाठी चे नियोजन हे फलकावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी महाशिवरात्रीच्या उत्सवाचा आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Mahashivratra Trimbakeshwar Temple Darshan