मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामात दिरंगाई, ताबा देण्यात विलंब अश्याप्रकारच्या अनेक तक्रारी बिल्डर्सच्या बाबतीत होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे आता या तक्रारींमुळे बिल्डरवर दणक्यात कारवाई सुद्धा होत आहे. अश्याच एका प्रकरणात बिल्डरला दणका देत तक्रारदारांना तब्बल ४ कोटी ७८ लाख रुपये देण्यात आले.
महारेराकडे हे प्रकरण आले होते. लिलावातून पैसे वसूल करून ३४ तक्रारदारांना ४ कोटी ७८ लाख रुपये देण्यात आले. या निकालानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता बोलली जात आहे. हे प्रकरण मुंबईतील असून यात एन.के. गार्डन्सचे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव करून तक्रारदारांना पैसे देण्याचा निर्णय महारेराने दिला. विशेष म्हणजे गृहनिर्माण प्रकल्पांच्या बाबतीत येणाऱ्या तक्रारींवर ग्राहकाभिमूख निकाल लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये बिल्डरविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत वाढत आहे. परंतु, लिलावातून पैसे वसूल करून ग्राहकांमध्ये वाटण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचेही बोलले जात आहे.
आता ही सुरुवात असून राज्यात अनेक ठिकाणी अश्याप्रकारच्या कारवाया होतील, असे संकेत महारेराने दिले आहेत. मालमत्ता जप्ती आणि लिलावाची मालिका लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत महारेराने केलेल्या कारवाईत भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव झाला. २० एप्रिलला झालेल्या या लिलावात नुकसान भरपाईची सर्वाधिक रक्कम ३१ लाख तर कमीत कमी रक्कम साडेतीन लाख होती.
आधारमूल्य ३ कोटी ७२ लाख!
खरे तर मालमत्तांचा लिलाव सुरू झाला तेव्हा ग्राहकांना आपले पैसे निघतात की नाही ही भिती होती. परंतु, प्रत्यक्ष लिलावात वेगळेच घडले. या मालमत्तांचे आधारमूल्य ३ कोटी ७२ लाख रुपये होते. पण लिलावात ४ कोटी ७८ लाख रुपयांची बोली लागली. त्यामुळे तक्रारदारांचा जीव भांड्यात पडला.