नाशिक – कवितेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या मनमाड येथील कुंदलगाव येथे महाराष्ट्रातील दिग्गज व प्रसिध्द कवीचे संमेलन ६ व ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या संमेलनाला समकालीन मराठी कविता..चर्चासत्र असे नाव देण्यात आले आहे. मनमाड येथील डॅा. म.सु. पाटील विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून निमंत्रक म्हणून प्रसिध्द कवी व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी देवीदास चौधरी व कवी प्रकाश होळकर आहे.
या चर्चा सत्रात वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, दा. गो.काळे, एकनाथ पगार, नीरजा, मीनाक्षी पाटील, सुनंदा भोसेकर, मंगेश नारायण काळे, दिनकर मनवर, गणेश कनाटे, संतोष पदमाकर पवार, अरुण ठोके, मंगेश घोडके, मनोज पाठक हे उपस्थितीत राहणार आहे. दोन दिवसाच्या या चर्चासत्रात समकालीन मराठी कविता – स्थिती आणि गती, समकालीन मराठी कवितेतील आशय व जीवनसृष्टी, समकालीन कवितेचे पवित्रे, समकालीन कवितेवरील इलेक्टॅानिक्स मीडिया आणि इंटरनेटचा प्रभाव, समकालीन मराठी कवितेतील भाषेचे नवे प्रयोग व नवकाव्य संकेतनिर्मिती, समकालीन मराठी कवितेतील सामाजिक प्रतिबध्दता, उत्तर आधुनिकेतेचा प्रभाव व कविता आणि जीवनसृष्टी, समकाली कविता आणि समीक्षा यावर चर्चा होणार आहे.
कवितेचा गजर आता महाराष्ट्रात
डॅा. म. सु. पाटील हे प्रदीर्घ काळ मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या काळात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवी नेहमी मनमाड येत असत. त्यामुळे हे गाव कवितेचे जंक्शन म्हणून ओळखले जाते. त्याच गावाजवळ असलेल्या कुंदलगाव येथे त्यांचे विद्यार्थी देवीदास चौधरी यांनी या मोठ्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. डॅ. म. सु. पाटील यांच्या स्मृती जपण्याबरोबरच कवितेचा गजर आता महाराष्ट्रात या दिग्गज कवींच्या संमेनलातून होणार आहे.