नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात तयार करण्यात येणार असून या पार्कचे डिझाईन पुर्ण झाले आहे. पुर्व नागपूरातील लता मंगेशकर उद्यानाजवळील खाली जागेवर या उद्यानाचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास द्वारे दोन महिन्यात चालू होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामारर्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजीत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (एडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम – अल्मिको, नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र -सी.आर.सी. नागपूरच्या वतीने आयोजित सामाजिक सहाय्यता शिबीरा अंतर्गत मोफत सहायक साधने वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
दिव्यांग पार्कविषयी माहिती देतांना गडकरी म्हणाले की, या दिव्यांग पार्क मध्ये दिव्यांग तसेच जेष्ठांना आनंद, मनोरंजन, प्रशिक्षण, ब्रेल लिपी अश्या सर्व प्रकारच्या सुविधा राहणार आहेत. या सामाजिक सहायता शिबीरात हातभार लावणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी 27 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नागपूर शहरातील 28,000 आणि ग्रामीण नागपुरातील 8,000 अशा सुमारे 36,000 लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांना 2 लाख 41 हजार उपकरणे व साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व उपकरण व साहित्याची एकूण किंमत 34.83 कोटी रुपये आहे.
या उपकरणांच्या वितरणासाठी नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, आज हा या मालिकेतील पहिला कार्यक्रम होता . आज, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील 9,018 लाभार्थ्यांना एकूण 66 हजार उपकरणे देण्यात आली आहेत, ज्यांची एकत्रित किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.या 43 प्रकारच्या उपकरणांमध्ये प्रामुख्याने तीन चाकी सायकल व्हील चेअर, चालण्याच्या काठ्या, डिजिटल श्रवणयंत्र, दृष्टिहीनांसाठी स्क्रीन रीडिंग असलेले स्मार्ट फोन, ब्रेल कॅन (फोल्डिंग कॅन), यांसारखी साधने आणि साहित्य समाविष्ट आहे. कृत्रिम हात आणि पाय देखील यात समाविष्ट आहेत. या योजनेसाठी आधार कार्डवर आधारित नोंदणी चालू आहे.
या सर्व योजनांचा उद्देश दिव्यांगांना समाजाच्या मुख्य धारेत आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी यावेळी केले. सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या ‘अल्मिको’ या सहायक उपकरण बनवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या दिशेने प्रयत्नशील आहे .
नागपुरात प्रस्तावित दिव्यांग पार्कमध्ये दिव्यांगाच्या बौद्धिक वाढीसाठी तसेच मनोरंजनासाठी अॅकॉस्टिक रुम, लोकोमोटर सुविधा, सुगमतेसाठी बॅटरी कार, व्हिलचेअर, रेलिंगची व्यवस्था, गंध आणि स्पर्शावरुन ओळखता येणारी पुष्पवाटीका असणार आहे. या पार्कच्या उभारणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आवश्यक तो सर्व निधी पुरवणार असे आश्वासनही वीरेंद्र कुमार यांनी यावेळी दिलं.
या शिबीराच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार उपस्थित होते.याप्रसंगी आमदार मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन. बी, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या शिबीरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते दिव्यांगाना साहित्य वितरित आले. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.
Maharashtra’s First Divyang Park in Nagpur Features
Minister Nitin Gadkari Senior Citizens Disable Persons