इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम आहे. कधीही हा कार्यक्रम सुरू करावा आणि खळखळून हसावं असा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. यातील सगळेच कलाकार, त्यांची स्किट्स प्रेक्षकांना भावतात. यात आलेल्या नवीन कलाकरांना देखील जुन्या ज्येष्ठ कलाकारांनी सामावून घेतले. नव्या – जुन्याचा हा संगम प्रेक्षकांनी देखील सहज स्वीकारला. मात्र, या कार्यक्रमातील एका स्किटमुळे हास्य अभिनेता समीर चौगुले अडचणीत आला आहे. आणि त्यामुळे त्याने माफी देखील मागितली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अभिनेता समीर चौगुले हे ‘हास्यजत्रे’तील लोकप्रिय अभिनेते. अभिनयासोबतच ते स्किटही लिहितात. त्यांची विषयांची निवड देखील प्रेक्षकांना आवडते. त्याचं प्रत्येक स्किट प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. त्याने सादर केलेल्या एका स्किटवर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्याला सगळ्यांसमोर माफी मागावी लागली आहे.
समाजाचा आक्षेप काय होता?
समीरने एका स्किटमध्ये तारपा नृत्य सादर केलं होतं. मात्र हे नृत्य त्याने अतिशय विनोदी पद्धतीने सादर केलं. त्याचा ३० सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर एका विशिष्ट समाजाने आक्षेप घेतला. त्यांनी केलेल्या विरोधामुळे समीरला जाहीर माफी मागावी लागली. समीरने घडल्या प्रकारानंतर एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर त्यांची माफी मागितली आहे.
या व्हिडिओमध्ये समीर म्हणतो, ‘मी काही दिवसांपूर्वी एक प्रहसन सादर केलं होतं. त्यात मी तारपा नृत्य सादर करतोय असं म्हणालो होतो. माझ्या लक्षात आलं की माझ्या बंधू आणि भगिनींच्या भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या. झालेल्या प्रकाराबद्दल सगळ्यात आधी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो आणि हा प्रकार पुन्हा होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झालेला होता.’ समीरचा हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Maharashtrachi Hasya Jatra Actor Sameer Choughule