मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश विधान भवनातील दालनात जारी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्हा परिषद, पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांची उपस्थिती होती.
मंत्री श्री.महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसेच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेल्या योग्य निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून, या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शंभर टक्के स्वयंचलित पद्धतीने करण्यात आल्या आहेत.
आंतरजिल्हा बदल्यासाठी एकूण 11871 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 34 जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आल्या आहेत. आलेल्या एकूण अर्जापैकी 33% बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी एका जिल्ह्यात १० वर्षे, त्यापैकी एका शाळेत किमान ५ वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी यांचा विशेष संवर्ग भाग-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच पती-पत्नी एकत्रिकरणाकरिता विशेष संवर्ग भाग-२ मध्ये समावेश केला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Maharashtra ZP School 3943 Teachers Transfer Order
Education Government Rural Inter District