मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद उफाळून आला असून नुकत्याच झालेल्या बैठकीत दोन गटात हाणामारी झाली. कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या या फ्रीस्टाइलमुळे युवक काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली आहे. या सर्व प्रकाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कामकाजावर कार्यकर्त्यांच्या एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्याविरुद्ध तसा प्रचारदेखील सुरू आहे. आंदोलनाच्या वेळी राऊत विदेशी दौऱ्यावर जात असल्याचीही टीका यापूर्वी झाली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमधील घराणेशाही पुन्हा एकदा पुढे आल्याची चर्चा जोरात आहे. अशात राऊत यांच्याविरुद्ध युवक काँग्रेसमधील गट सक्रिय झाला आहे. बैठकीदरम्यान त्या गटाने राऊत यांना बदलण्याची मागणी केली. त्यानंतर या बैठकीत काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे या बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याची घटना घडली आहे.
युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली. बैठकीदरम्यान दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.
हाणामारीचा दावा फेटाळला
युवक काँग्रेस अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास हे बैठकीनंतर तातडीने निघून गेले. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. यावेळी कार्यकर्त्यांनी बैठकीत काही झाले नसल्याचे सांगत हाणामारी झाल्याचे दावे फेटाळले. तर कुणाल राऊत यांना पत्रकारांनी बैठकीतील घटनेबद्दल विचारले असता, त्यांनी बैठकीत काही झाले नाही, असे म्हणत निघून गेले.