मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. देशातील विविध शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहे. वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेनपैकी एक असून ही हाय स्पीड ट्रेन आहे. महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.
वंदे भारतचा कमाल वेग १६० किमी/तास आहे. ही ट्रेन संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये ८० टक्के उत्पादने स्वदेशी बनवण्यात आली आहेत. या गाड्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजा आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे यांचा समावेश आहे.
आतापर्यंत भारतात विविध राज्यांमध्ये सुमारे १७ वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातून ४ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आता आणखीन २ वंदे भारत ट्रेन धावणार असल्याने त्यांची एकूण संख्या ६ होणार आहे. आत्तापर्यंत मुंबईत तीन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यात मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर यांचा समावेश आहे. तर, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर एक ट्रेन धावत आहे. आता मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल.
नागपूर ते हैदराबाद
नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच सुरू होणार आहे. नागपूर आणि हैदराबादचे अंतर ५८१ किलोमीटर आहे. यासाठी सध्याच्या रेल्वेगाड्या साधारणपणे दहा तासांचा कालावधी घेतात. नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास हा कालावधी दहा तासांवरून साडेसहा तासांचा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची प्रतीक्षा होती.
सुधीर मुनगंटीवार सेवाग्राम येथे वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेसह पाचही जिल्ह्यांतील व्यापारी वर्गाला व नागरिकांना या रेल्वे सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. सकाळी सहा वाजता नागपूर स्थानकावरून नागपूर-हैदराबाद वंदे भारत रेल्वे सुटणार आहे. तर दुपारी साडेबारा वाजता हैदराबादला पोहोचेल. हैदराबादहुन दुपारी दीड वाजता ही एक्स्प्रेस निघुन रात्री आठ वाजता नागपूर येथे पोहोचेल.
मुंबई ते गोवा
मुंबईला चौथी वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. मुंबईत आतापर्यंत तीन वंदे भारत गाड्या धावत असून त्या मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावत आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धावणारी चौथी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल. दरम्यान मंगळवारी मुंबई-गोवा मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भगत एक्स्प्रेस ट्रेनची चाचणी घेण्यात आली.
तिचा वेग १८०किमी प्रति तास वेग असून वंदे भारत ट्रेन मुंबईतील सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून सकाळी ५.३० वाजता निघेल आणि दुपारी १२.५० वाजता गोव्याच्या मडगाव स्थानकावर पोहचेल. त्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास मडगावहून निघेल आणि रात्री ८.५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सध्या मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी ८ तास लागतात. त्याच वेळी, वंदे भारत सुरू होईल तेव्हा हा प्रवास फक्त ७ तासांचा असेल.
Maharashtra Will get Again 2 Vande Bharat Train