मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या संपूर्ण तीन दिवसात उष्णतेच्या झळा सहन करण्यातच जाणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उकाडा जास्त
शुक्रवारी सकाळी अकरापासून दुपारी दोनपर्यंत तापमानात वाढ होऊन दुपारनंतर काही ठिकाणी विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत पुढील तीन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून तापमान दुपारी २ वाजेपर्यंत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या वेळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. समुद्रकिनारा नजीक असणाऱ्या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यानेही उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
मोसमी वाऱ्यांची आगेकूच
याबाबत हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. तसेच उष्णतेत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सातारा, सांगली, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचाही अंदाज आहे. बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या मोसमी वाऱ्यांची आता आगेकूच सुरू झाली आहे. मोसमी वारे पुढे सरकण्यास सध्या अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे रविवार, ४ जून रोजी मोसमी वारे केरळात दाखल होण्याची चिन्हे आहेत.
Maharashtra Weather Forecast Climate