मुंबई – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुत्तवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी दिली.
वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड करण्याकरिता वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्ली, व्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची मतदारयादी अद्ययावत करण्यात येत आहे. राज्यातील सर्व वक्फ संस्थांच्या मुतवल्ली, व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांना वक्फ मंडळामार्फत आवाहन करण्यात येते की, ज्या वक्फ संस्थांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा जास्त आहे त्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुतवल्ली, नामनिर्देशित सदस्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याकरिता सन २०२०-२१ या वर्षापर्यंत संबंधित वक्फ संस्थेचे लेखापरीक्षण करून, वार्षिक लेखे व त्या अनुषंगिक वर्गणी जमा करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कार्यवाही संबंधित वक्फ संस्थांनी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.