इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल उद्या वाजणार असल्याची चर्चा आज राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे. मंगळवारी राष्ट्रीय निवडणूक आयोग राज्याच्या विधानसभेची पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता घोषित होणार आहे.
दर मंगळवारी होणारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज सोमवारीच घेण्यात आल्यामुळे ही चर्चा जोरात सुरु झाली आहे. आजच्या बैठकीत तब्बल १९ मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची सात जणांची यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्री आणि आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात रवाना झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक उद्या घोषित होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता दिनांक १५ ऑक्टोबर पासून सुरु होईल. १९ नोव्हेंबरला निवडणूक व २२ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.